शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालंय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर त्यांच्या त्यांच्या गाडीला अपघात झाला. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल त्यांचं पार्थिव मुंबईतील वडाळ्यातील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी ते बीडच्या दिशेने रवाना झालं.
मेटे यांचं पार्थिव बीडमधील केज तालुक्यातील राजेगाव या त्यांच्या मूळगावी दाखल झालं आहे. गावातील लोक, त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांना अंत्यदर्शन घेता यावं यासाठी त्यांचं पार्थिव शिवसंग्राम भवनात आणि त्यांच्या घरात ठेवण्यात येणार आहे. विनायक मेटेंवर आज दुपारी तीन वाजता राजेगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
विनायक मेटे यांच्या काल पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले.
तसेच उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. विनायक मेटे म्हणजे आंदोलनांचा बुलंद आवाज. सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारत सळो की पळो करून सोडणारे विनायक मेटे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरत आंदोलन करणारे विनायक मेटे. मराठा समाजाच्या आंदोलनांचा चेहरा… अश्या या नेत्याच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळलाय.