युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबादच्या दौऱ्यावेळी त्यांच्या गाडीवर दगडफेक आणि महालगावातील कार्यक्रमात गोंधळ घातल्याची घटना घडली. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खूपच आक्रमक झाले आहेत.
यावरून सोलापुरात ठाकरे गटाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवदेन सादर करत आदित्य ठाकरेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणीही करण्यात आली. युवासेनेचे सहसचिव शरद कोळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटावर जोरदार निशाणा साधत गर्भित इशाराही दिला. उंदरं मांजरं कितीही पन्नास खोके खाऊन मोठी झाली तरी ती वाघाची शिकार करू शकत नाहीत.
आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची देण्यात यावी. आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्यामागे शिंदे गटाचे षडयंत्र होते. त्यामुळे आगामी काळात आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत सर्वस्वी शिंदे गट आणि भाजप सरकार जबाबदार राहील असा इशारा शिवसैनिकांडून देण्यात आला.