महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज्यातील राजकीय घडामोडीवर भाष्य केले. तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केलेली टीका म्हणजे मुळात जुन्या कढीला आलेला हा ऊत दिसतोय, असे पेडणेकर म्हणाल्या.
पुढे बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, २०-२५ वर्षांनंतर हे साक्षात्कार बाहेर येत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कोंडी केलेली दिसते. नाव घेतल्याशिवाय राजकारण चालूच शकत नाही, असे महाराष्ट्रात चित्र दिसत. उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण किंवा शिवसेना कोणत्या कटकारस्थानाने काढून घेतली हे सर्वांनी पहिले आहे. त्यात किती जणांनी गळाभेटी घेतल्या आहेत, किती जण त्यात मी नाही असे म्हणू शकत नाहीत, ते सर्व जनतेने पाहिले आहे असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते
माहीमच्या समुद्रात अनधिकृतपणे दर्ग्याचे बांधकाम चालू असल्याचा दावा राज ठाकरेंनी काल मेळाव्यात केला. त्यावरही किशोरी पेडणेकरांनी प्रतिक्रिया दिली. ते अनधिकृत आहे. त्यावर सगळ्यांनी मिळून कारवाई करायला हवी. मग ते काहीही असो. मंदिर असो, दर्गा असो अनधिकृत करू नका. तेही जिथे २४ तास गस्त असते तिथे या गोष्टी घडत आहेत. पण ते अडीच वर्षांनंतरच का सांगितले, हादेखील एक मुद्दा आहे, असे पेडणेकर म्हणाल्या.