माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर आज काही प्रश्न हे वेगळ्या मार्गावर गेले असते, पण जर तरला अर्थ नसतो. सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्यापाठीमागे आहे. त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळेल असं छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
दोन ते तीन दिवसांत निर्णय अपेक्षित दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना सध्या न्यायालयात सुरू असलेल्या राज्याच्या सत्तासंघर्षावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. वकील वेगवेगळे मुद्दे निर्माण करत आहेत. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते हे पहाणं महत्त्वाचं आहे. एक प्रकारचा कानुनी लोचा निर्माण झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत निर्णय लागणे अपेक्षित असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनावरून भुजबळ यांनी शिंदे, फडणवीस सरकारला देखील टोला लगावला आहे. एसटीचे विलिनीकरण व्हावे अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
पवार साहेबांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे आता एसटीचे विलिनीकरण करून घ्यावे, सदावर्ते यांनी सरकारच्या घरावर मोर्चे न्यावेत असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. ज्योतिर्लिंगावरून टोला आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रात नसून आसाम येथे असल्याचं म्हटलं होतं यावरून भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. घेऊन जा सगळं आता तेवढंच राहिलं आहे. आपले लोक तिकडं गेले होते त्यांनी सांगितलं की काय असं म्हणत भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.