कोल्हापूर | संजय राऊत यांच्या विधीमंडळ नव्हे हे चोरमंडळ या एका वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधीमंडळात दिसून येत आहे. सत्ताधारी पक्ष संजय राऊत यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. तर विरोधकांमधील राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही संजय राऊत यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नाहीत, अशी भूमिका घेतली आहे. संजय राऊत यांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, असं मत विधानसभा अध्यक्षांनीही मांडलं.
विधीमंडळ नव्हे हे चोरमंडळ आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात केलं. शिवगर्जना यात्रेसाठी ते कोल्हापुरात पोहोचले होते. सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तसेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा उद्धव ठाकरे यांनी मोगँबो असा उल्लेख केला होता यावरून भाजपा चांगलीच आक्रमक झाली होती आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी शहांचा मोगँबो असा उल्लेख करत डिवचले आहे.
अमित शाह यांचा नुकताच कोल्हापूर दौरा झाला. अमित शाह कोल्हापुरात होते, त्याच दिवशी निवडणूक आयोगाचा निर्णय आला. त्यावेळी ते म्हणाले, आयोगाने सत्याच्या बाजूने निर्णय दिला. संजय राऊत यांनी यावरून जोरदार टीका केली. ते म्हणाले, सत्य काय आहे २०२४ साली समजेल. दिल्लीत आणि महाराष्ट्रातही आमचं राज्य असेल. गद्दारांच्या हातात महाराष्ट्राच्या चाव्या देतात. शिवसेनेच्या वाघाच्या शेपटीवर पाय देतायत लक्षात ठेवा. वाघ जखमी झालाय. बघुया कोर्टात काय होतंय…असा इशारा संजय राऊत यांनी दिला.