महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवता आलेले नाही. शरद पवारांसारखे दिग्गज नेतृत्व असूनही आलेल्या या अपयशावरून विरोधक राष्ट्रवादीला डिवचत असतात. दरम्यान, २००४साली विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र तेव्हा हातातोंडाशी आलेली मुख्यमंत्रिपदाची संधी पक्षाने दवडली होती.
दरम्यान, २००४साली मुख्यमंत्रिपदावर पाणी सोडणे ही पक्षाची सर्वात मोठी चूक होती. कुणालाही मुख्यमंत्री केले असते तरी चालले असते, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केली.
पक्षाने कुठल्या चुका केल्या आणि त्यामुळे काय नुकसान झाले? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, ते सांगण्यात आता अर्थ नाही. एक मात्र मोठी चूक वाटते ती म्हणजे २००४ साली संधी मिळूनही पक्षाने मुख्यमंत्रिपद सोडायला नको होते. मी खरे तेच सांगतोय. आर आर पाटील, छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री करायचे होते. किंवा आमच्या वरिष्ठांच्या मनात कोण होते त्यांना मुख्यमंत्री करायचे होते. पण २००४ला जर मुख्यमंत्रिपद जर राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला घेतले असते तर शेवटपर्यंत बदल होऊ दिला नसता, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
यावेळी २००४मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा अधिक होत्या, तरी मुख्यमंत्रिपद न घेण्याचा निर्णय कुणी घेतला हा प्रश्न विचारला असता, अजित पवार म्हणाले की, आम्ही तेव्हा खूप लहान नेते होतो. निर्णय प्रक्रियेमध्ये बोलणारे कोण होते तर प्रफुल्ल पटेल, मधुकर पिचड, छगन भुजबळ, पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील हे आमचे नेतेगण होते. त्यांनी सांगायचे आणि आम्ही त्याला होकार द्यायचा, असे अजित पवार म्हणाले.