सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे , ०७ ऑक्टोबर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. शा.म. मुजुमदार, जेष्ठ शल्यचिकीत्सक डॉ. के.एच. संचेती, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे , जेष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, मराठीतील प्रसिद्ध लेखीका डॉ. अरुणा ढेरे अशा नामवंत पाचही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केंद्रीय मंत्री धर्मेद्रजी प्रधान यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्रकुलगुरु डॉ. पराग काळकर, माजी विद्यार्थी संघाचे डॉ. राजेश पांडे, तसेच विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, विद्यापरीषद सदस्य, अधिसभा सदस्य यांच्या सह पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. ते म्हणाले कि, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या निमित्ताने त्यांचा कर्तृत्वाचा परिचय होत आहे.
सिंबायोसिसचे डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी त्यांच्या गावी शिक्षणाचे रोपटे लावून शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य केले आहे. कृत्रिम अवयव तयार करून लोकांच्या जीवनात संजीवनी निर्माण करण्यासाठी झटणारे डॉ. के. एच. संचेती आणि पुणे शहरात नृत्य प्रशिक्षणाच्या २५ संस्था स्थापन करणाऱ्या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना शमा भाटे यांचेही कार्य उल्लेखनीय आहे. इथेनॉल निर्मितीसाठी कार्य करणारे ज्येष्ठ उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी आणि जेष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे या सर्वच सत्कारमूर्तीनी समाजात आपला ठसा उमटविला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून पुणे विद्यापीठांतर्गत शास्त्रीय नृत्य संस्था स्थापन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.