मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाला सावरण्यासाठी राज्यभर दौरे करणारे आदित्य ठाकरे हे बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. त्यांच्या अनपेक्षित बिहार दौऱ्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्या भेटीबाबत सध्या अनेक चर्चा रंगत आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षपाथोपात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी या दौऱ्यावर टीकास्त्र सोडले आहे. तुमची काय अवस्था झाली हे एकदा आरशात बघा, असे ते म्हणाले. टिकेमुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गट आणि मनसे आमनेसामने येणार आहे.
“आदित्य ठाकरेंचा स्वत:वर आणि उद्धव ठाकरेंवर विश्वास उरलेला नाही, की त्यांचे चेहरे बघून येथील लोक मतदान करतील. एका काळ असा होता की शिवसेनाप्रमुखांच्या नावावर मते मिळायची. आता जर तुम्हाला तेजस्वी यादवांना आणावे लागत असेल, तर तुमची काय अवस्था झाली आहे हे एकदा आरशात बघा.” असे ते म्हणाले. तेजस्वी यादवांना मुंबई महापालिका निवडणुकीत आणण्यासाठी ही भेट असल्याची चर्चा आहे, असेही त्यांनी सांगितले.