Latest Marathi News

BREAKING NEWS

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी

0


नाशिक : प्रतिनिधी

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यावेळी पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली.

सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीनंतर नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरु आहेत. सुधाकर बडगुजर यांनी आपण स्वत: तर नाराज आहोतच, पण महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह १० ते १२ जण नाराज असल्याचा दावा केला होता. शिवाय सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले. ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले. महत्त्वाचे म्हणजे या पत्रकार परिषदेला उपनेते सुधाकर बडगुजर अनुपस्थित होते. नियोजित कार्यक्रमासाठी नाशिक बाहेर असल्याने सुधाकर बडगुजर पत्रकार परिषदेला गैरहजर राहिले. महानगर प्रमुख विलास शिंदे हे मात्र उपस्थित होते.

महत्त्वाचे म्हणजे सुधाकर बडगुजर यांनी कालच दावा करत विलास शिंदे यांच्यासह दहा ते बारा जण पक्षात नाराज असल्याचा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या पत्रकार परिषदेकडे नाशिकसह राज्याचे लक्ष लागले आहे. महानगर प्रमुख विलास शिंदे, खासदार राजभाऊ वाजे, जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी, उपनेते सुनील बागुल, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.