आता एकत्रच राहणार, ठाकरे बंधूंचा निर्धार, दोन्ही भावांची शाब्दिक फटकेबाजी
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईमधील वरळी डोम परिसराला आज जणू आनंदाचे भरते आले होते. गेल्या १८ वर्षानंतर मनसे आणि उद्धवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी एकत्र आले. सभागृह आणि बाहेरील परिसर मनसैनिक, शिवसैनिकांनी तुडुंब भरला होता. हा एका पक्षाचा सोहळा नव्हता. पण दोन्ही भावांनी एकाच पक्षात असावा, असा सूर आणि संकेत या विजयी मेळाव्यातून दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर वाग्बाण सोडले. त्यांच्या शाब्दिक फटकेबाजीने परिसर दणाणला. सरकारला दोघांनी धारेवर धरले. पण मराठी, मराठी माणूस या अस्मितेसाठी एकत्र आलो आणि आणि आता एकत्र राहणार अशी ग्वाही दिली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. एक गद्दार काल म्हणाला, जय गुजरात. किती लाचारी करायची. पुष्पा पिक्चर पाहिला झुकेगा नाही साला. आता हे गद्दार म्हणतात उठेगा नही साला. उठायला आहे काय तुझ्याकडे. कसे उठणार तुझे. विचार म्हणतोय, अशी बोचरी टीका त्यांनी शिंदेवर केली. मालकासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांचा पाईक असेल का, असा सवाल त्यांनी विचारला. म्हणून म्हणतो डोळे उघडा. आताच जागी व्हा. आता येणारी जाग जाणार असेल तर मग मात्र मराठी आईची मुले म्हणू नका. शिवसेना प्रमुखांनी शिकवले की अन्याय करू नका. पण अंगावर हात उद्गारला तर तो जागेवर ठेवू नका, असा इशारा त्यांनी दिला.
फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही म्हणता, एक मराठी माणूस दाखवा इतर राज्यात गुंडगिरी करणारा. मराठी माणसाने दादागिरी केली तर त्याला तिकडे उभे चिरून टाकली. मग आमच्या घरात न्याय हक्काची गोष्ट सुरू केली तर बिघडले कुठे. राजने सांगितले तसे आमचे सर्वांचे इतर अमराठी मित्र आहेत. तुम्ही आमच्यात विष टाकता. तुमचे डाव उघड झाले आहे. महाराष्ट्राला आवाहन करतो. कोणत्याही पक्षाचे असू आपण एकजूट केली पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. भाजपच्या मराठी माणसानेही त्यात आले पाहिजे. का नाही यायचे. ज्या राज्यात राहता, मातीत जन्माला आला, त्याचे धिंडवडे काढणार असतील, त्यांना पायघड्या टाकणार असू तर असे षंडाचे जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, असे ते म्हणाले.
मी राज ठाकरेंना परवा फोन केला. अरे आपल्या पिक्चरचे प्रिमीयर असल्यासारखे विचारताहेत आत कसे येऊ. हा प्रीमियर असेल पण आजपासून सुरुवात झाली आहे. एक तर आम्ही दादागिरी करणार नाही. कुणी दादागिरी केली तर सहनही करणार नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितेले तेच सांगतो. मराठा मराठेत्तर, ब्राह्मण ब्राह्मणेत्तर, स्पृश्य अस्पृश्य आणि घाटी कोकणी हे भेदाभेट मिटवून एक या. तुटू नका फुटू नका आणि मराठी ठसा पुसू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता होती, तो ठाकरे बंधूंचा मेळावा तितकाच भारदस्त आणि ग्रँड आयोजनाने संपन्न झाला. या सोहळ्यात दोन्ही ठाकरे बंधूची भाषणंही तितकीच प्रभावी झाल्याचे पाहायला मिळाले. दोघांनी अप्रत्यक्षपणे भाजपला डिवचले तर उद्धव ठाकरेंनी थेट नाव घेऊन भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. या सोहळ्यातील भाषणानंतर ठाकरे कुटुंबीय देखील व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतरही राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हेही एकत्र येऊन मीडियाला सामोरे गेले. त्यावेळी, शेजारीच उभ्या असलेल्या खासदार सुप्रिया सुळेंनी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना हाताला धरुन पुढे घेतलं. राज ठाकरेंच्या शेजारी आदित्य आणि उद्धव ठाकरेंच्या शेजारी अमित यांना उभे करत आत्याबाईंची भूमिका बजावल्याचं पाहायला मिळालं.
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल १९ वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली, हा क्षण पाहून अवघा महाराष्ट्र भावूक झाल्याचे दिसून आले. दरम्यान, विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटो काढले. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला.
आमच्याकडे रस्त्यावरची सत्ता : राज ठाकरे
आजच्या मेळाव्याला घोषणा हीच आहे कोणताही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा. मराठीकडे कुणी वाकड्या नजरेने पाहायचे नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तुमच्याकडे विधानभवनात सत्ता आहे आणि आमच्याकडे रस्त्यावर सत्ता आहे, असे राज ठाकरेंनी सांगितले. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. अमित शाह म्हणतात, ज्याला इंग्रजी येत त्याला लाज वाटेल इंग्रजी येते म्हणवून. पण तुम्हाला येते कुठे? आम्ही मराठी भाषा कधी लादली का? हिंदी फक्त २०० वर्ष पूर्वीची आहे. यांनी आत्ता चाचपडून पहिले. यांना काय मज्जाक वाटली का सक्ती करायला? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितले. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचे ठरले आहे. मला बाळासाहेबांनी सांगितले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल. असे संस्कार झालेला व्यक्ती मराठीसाठी तडजोड करेल का, असा सवाल उपस्थित करत मराठीसाठीची एकजूट कायम राहणे गरजेचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
जय गुजरात म्हणणारे बाळासाहेबांचे पाईक कसे? : उद्धव ठाकरे
बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते, कोणावरही अन्याय करु नका. पण कोणी अंगावर हात उगारला तर तो हात जागेवर ठेऊ नका. देवेंद्र फडणवीस म्हणतात भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही. फडणवीसांचे सगळे चेलेचपाटे हेच म्हणतात. पण मराठी माणूस इतर राज्यांमध्ये जाऊन कोणावर भाषिक दादागिरी करेल का? इतर राज्यांमध्ये कोणी असे केले तर भाषिक दादागिरी करणाऱ्या व्यक्तीला चिरुन टाकतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. काल एक गद्दार ‘जय गुजरात’ बोलला. अरे किती लाचारी करायची? पुष्पा पिक्चरमध्ये हिरो दाढीवरुन हात फिरवून म्हणतो, ‘झुकेगा नही साला’. पण आपले गद्दार म्हणतात, ‘कुछ बी बोलो, उठेगा नही साला’. हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. आपण आता डोळे उघडले नाहीत तर पुन्हा कधी आपले डोळे उघडण्याची वेळ येणार नाही. आता आलेली जाग जाणार असेल तर भविष्यात स्वत:ला मराठी आईची मुलं बोलू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.