ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला डिवचले आहे. मनसेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षांनी अंधारेंच्या सभेत राडा करण्याची धमकी दिली होती. तर यावर अपना एक स्टाईल हैं, इलाका तुम्हारा और धमाका हमारा, असे म्हणत अंधारे यांनी मनसेला खुले आव्हान दिले. या पूर्वी सुद्धा अंधारे यांनी थेट राज ठाकरेंवर टीका केली होती.
मनसेच्या टीकेवर मी केवळ हसू शकते. ‘अपना एक स्टाईल हैं, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’. मी पाठीमागे अजिबात बोलत नाही. मी जे बोलते ते अत्यंत वस्तुस्थिती आणि सत्य ते बोलत आहे. आजारपणाची टिंगल करणं हे कुठल्याही सुसंस्कृत, सभ्य, संवेदनशील माणसाला रुचणारं नाही, असे अंधारे यांनी पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खडेबोल सुनावले.
मी मुलुंडच्या सभेत मांडलेले मुद्दे गैरलागू आहेत, असं कोणाला वाटत असेल, तर माझी चर्चा करण्याची तयारी आहे. असं असलं तरी ते मुद्द्यांची भाषा गुद्द्यांवर नेणार असतील तर शिवसेनेला गुद्द्यांची भाषा कुणीही शिकवण्याची गरज नाही. राडा संस्कृतीचा एनसायक्लोपिडिया शिवसेनेने लिहिला आहे, असेही अंधारे म्हणाल्या.