Latest Marathi News

BREAKING NEWS

सुधीर मुनगंटीवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर दानवे संतापले

0

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी घडून आणला असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. यावरून आता अंबादास दानवे यांनी मुनगंटीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपमध्ये आम्हाला धडा शिकवण्याची धमक नाही, तुम्हाला सत्तेची भूक आहे. स्वत: जे पाप केलं आहे, त्याच्यावर पांघरून घालण्यासाठी मुनगंटीवार असं बोलल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना विलंब होत आहे. महापालिकांचा कालावधी संपल्यानं महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून देखील दानवे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढते आहे, हे मला मान्य नाही. उद्धव ठाकरे आधीच लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्या लोकप्रियतेला सरकार घाबरले आहे, त्यमुळेच निवडणुका घेण्याची हिम्मत हे सरकार करत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच आम्ही पहाटेचा शपथविधी घडून आणला होता. उद्धव ठाकरे यांनी युतीमध्ये निवडणूक लढवली आणि नंतर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवारही तयार होते. त्यांनी कोणतीही अट ठेवली नव्हती त्यामुळे पहाटेचा शपथविधी घडल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेला दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.