टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचे निधन झाले आहे. विजेचा धक्का लागून संतोषचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोषसोबतच बाबुराव मुंडे यांचाही मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. संतोष मुंडे आणि बाबुरा मुंडे हे दोघे डीपीचा फ्यूज बदलण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
संतोष मुंडे हा फेमस टिकटॉक स्टार होता. त्याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. संतोष मुंडे या ग्रामीण भागातील हरहुन्नरी तरुणाच्या मृत्यूप्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांनी देखील शोक व्यक्त केला असून महावितरणच्या कारभारावरुन या कंपनीलाच जबाबदार धरलं आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांच्या पोरांना ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव आणि अपुऱ्या सुविधा यामुळं आपला जीव धोक्यात घालून स्वतः बरीच कामं करावी लागतात. या दुर्दैवी अपघाताची जबाबदारी महावितरणने घ्यावी, या अपघातात नेमकी कुणाची चूक आहे हे समोर आलं पाहिजे. संतोष व अपघाती मृत्यू झालेल्या अन्य तरुणाच्या कुटुंबास महावितरणने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.