शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधत शिवसेनेतून आता घाण निघून गेली, आता सगळं चांगलंच होणार असं वक्तव्य केलं होतं. शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं होतं. यावरून माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
तुमच्या बुद्धीची कीव येते असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. “पर्यावरण मंत्री म्हणून माझं हेच काम होते राज्यात कोठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे याचा आनंद आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तुम्ही घरातल्या सोन्यासारख्या माणसांना गमावणे याला घाण स्वच्छ करणे म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव येते… विनाशकाले विपरीत बुद्धी!” असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी गेले अनेक वर्ष आपण शिवसेना म्हणून एकत्र आहोत, कोणाचा डोळा असला तरी मुंबईला कोणाची नजर लागू दिली नाही. ज्यांनी सभागृहात ताकद दाखवली ते आज आमच्यासोबत आहेत. गेले दोन चार दिवस जे वातावरण आहे, त्यावरून एकच दिसतंय आता घाण निघून गेली, जे काही व्हायचं ते चांगलंच होणार, असं म्हटलं होतं.