Latest Marathi News

BREAKING NEWS

*साहित्यिक सुनिल शिनखेडे आणि “टीम आकाशवाणी सोलापूर”ला मानाचा मुजरा!*

0

*साहित्यिक सुनिल शिनखेडे आणि “टीम आकाशवाणी सोलापूर”ला मानाचा मुजरा!*

राजा माने

मुंबई:(खमक्या इंडिया नेटवर्क)क्षेत्र कुठलेही असो,तिथे घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचे प्रतिबिंब सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उमटणारच..‌हे अभेद्य सूत्र आपण वर्षानुवर्षे अनुभवत आलो आहोत.. अनेक पिढ्यांची तर रोजची सकाळ सुरु व्हायची..माझी पिढी आणि लहानपणी मी गल्लीतील कोणाच्या तरी घरातील रेडिओ वरील सोलापूर आकाशवाणीचा कार्यक्रम कानांवर पडल्यावरच वाकळीतून बाहेर पडायचो.. रेडिओ नाही सुरु झाला तर मी वाकळीतच!.. सोलापूर आकाशवाणीशी हे अस्से अनामिक नाते जडल़ेली अगणित माणसे आहेत.पण या सर्वांचे हे नाते कवी मनाच्या साहित्यिक सुनिल शिनखेडे आणि त्यांच्या “टीम आकाशवाणी सोलापूर” ने अधिक घट्ट केले…आज या नात्याला उजळणी मिळायलाही निमित्त आहे.. प्रसार माध्यमांच्या आजच्या महापूरपर्वात आणि नव्या डिजिटल जगतात सोलापूर आकाशवाणी केंद्राने देशात तिसरा क्रमांक पटकावलाय् ! सोलापूरच्या शिरपेचात त्यांनी आपलाही एक मानाचा तुरा खोवला! हे सहज घडलेले नाही.त्यासाठी सहायक संचालक सुनिल शिनखेडे यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून आपल्या कवी मनाला पारखी नजर आणि सामाजिक बांधिलकीची जोड दिली. विश्वासार्हतेच्या कोंदणात गुणवत्ता आणि विविधता मढविल्याने आपोआपच सर्वसमावेशकता आली.समाज आणि सोलापूर आकाशवाणी यांच्यातील अतूट नात्याचा हाच तर खरा मंत्र आहे.शिनखेडे सरांच्या याच मंत्राने श्रोते, रसिक आणि सर्वच क्षेत्रातील माणूस भारावून जातो. कल्पकता आणि प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देवून ती गतिमान ठेवण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न असतो. तसा अनुभव मी स्वतः देखिल घेतला आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने पहिली आवृत्ती आणि ख्यातनाम प्रकाशक बाबुराव मैंदर्गीकर यांच्या सोलापुरातील सुविधा प्रकाशनने दुसरी आवृत्ती माझ्या “महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा” या पुस्तकाची आवृत्ती प्रकाशित केली होती. तिसऱ्या आवृत्ती च्या अनुषंगाने मात्र मी एक नवा प्रयोग केला.त्या प्रयोगांतील सोलापूर आकाशवाणीच्या बहुमोल योगदानाची आज मला कृतज्ञतापूर्वक आठवण होते. या पुस्तकाचे वाचन अत्यंत प्रभावी पद्धतीने अभिराम सराफ यांनी सोलापूर आकाशवाणीवर केले होते. त्या ऑडिओ मालिकेच्या बळावर मी प्रिंट बुक,ऑडिओ बुक आणि डिजिटल बुक या स्वरूपात “महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा” पुस्तक एकाच वेळी लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यात शिनखेडे सरांबरोबर आकाशवाणीचे माजी संचालक गजानन सुरवसे, महादेव जगदाळे आणि निवेदक अभिराम सराफ यांनी सिंहाचा वाटा उचलला.त्यामुळेच ऑडिओ बुक तयार झाले. लोकमतने संपादकीय संचालक ऋषीबाबू दर्डा यांनी डिजिटल बुक करण्यास फक्त परवानगीच दिली असे नाही तर लोकमत वृत्तपत्र समूहाच्या डिजिटल मीडिया विभागाला ते बुक व्यवसायिक पद्धतीने तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे माझी एकाच वेळी प्रिन्ट बुक, डिजिटल बुक आणि ऑडिओ बुक प्रकाशित करण्याची कल्पना साकार झाली. बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने त्याचा लोकार्पण सोहळा मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सुभाषबापू देशमुख, विजयकुमार देशमुख यांच्या हस्तेआणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्रबाबू दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील अनेक मान्यवरांच्या साक्षीने दिमाखात पार पडला. या उपक्रमाच्या श्रेयात सोलापूर आकाशवाणी केंद्र,शिनखेडे सर, अभिराम सराफ आणि त्यांच्या टीमचा मोलाचा वाटा राहिला. त्यांच्या त्या योगदानाबद्दल आम्ही त्या कार्यक्रमात त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान केला होता आज राष्ट्रीय पातळीवर आकाशवाणी सोलापूर केंद्राने मिळविलेले यश आणि कीर्ती यामुळे ती आठवण जागी झाली. सुनील शिनखेडे आणि टीम आकाशवाणी सोलापूर केंद्राने राष्ट्रीय पातळीवर संपादन केल्याबद्दल त्यांना त्रिवार मानाचा मुजरा!
*राजा माने*
Leave A Reply

Your email address will not be published.