मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील खासदारांमध्येही चलबिचल असल्याचे दिसत आहे. जवळपास १२ खासदार हे शिंदेंसोबत जातील, असे म्हटले जात आहे. त्यातच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या खासदारांमध्ये दोन गट पडण्याची चिन्हे आहेत. दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे आदेश पक्षाच्या खासदारांना द्या, असे पत्र मंगळवारीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जाण्याची स्पष्ट भूमिका शिवसेनेच्या एकाही खासदाराने आतापर्यंत घेतलेली नाही. मात्र, १२ खासदार हे शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जाते. माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी तसा दावा केला आहे. शिवसेनेच्या चार खासदारांनी बंडाच्या काळात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले होते. भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा दबाव पक्षातील अधिकाधिक खासदारांकडून येऊ शकतो.
खासदार फुटले तर राज्यातील सत्ता हातून गेलेल्या ठाकरे यांना दुसरा मोठा धक्का बसेल. पक्षावरील ताब्यावरून नजीकच्या काळात ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्या संघर्षात खासदारही साथ सोडून गेले तर ठाकरे यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार आहे.