शिवसेनेने 2019 मध्ये भाजपसोबतची पारंपरिक युती तोडली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीची स्थापना केली. भाजपने तेव्हापासूनच हिंदूत्व सोडल्याचा शिवसेनेवर आरोप केला. भाजपच्या आरोपांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत रोखठोक उत्तर दिलं आहे.
भाजपवर टीकास्त्र सोडताना भाजपने केलेल्या अनेक युत्यांचा पाढाच उद्धव ठाकरे यांनी वाचून दाखवला. काय म्हणाले उद्धव ठाकरे? आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून तुम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हणताय. मग मुफ्ती महंमद आणि मेहबुबा मुफ्तीसोबत तुम्ही गेला होतात, ते काय होतं?काय सोडलं होतं तुम्ही? आता तुम्हाला वाटतं की, आम्ही हिंदुत्व सोडलं, जे आम्ही सोडलेलंच नाही. पण तेव्हा तुम्ही लाज सोडली होतीत ना? त्या मेहबुबा मुफ्ती आजसुद्धा ‘वंदे मातरम्’ म्हणतात का? की ‘भारत माता की जय’ बोलतात? असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, बिहारमध्ये नितीशकुमारसोबत बसले आहेत. नितीशकुमार हिंदुत्ववादी आहेत का? कारण मला जे आठवतं त्यानुसार त्यांनी एकदा ‘संघमुक्त भारत’ असा नारा दिला होता. पण संघमुक्त भारत असा नारा शिवसेनेने कधी दिला नाही. एका हिंदुत्वाच्या ध्यासापायी, वेडापायी बाळासाहेबच यांना वाचवत आले होते आणि वाचवलं होतं.
पण दिल्लीत बसल्यावर त्या दिल्लीतल्या खुर्चीला वेगळा काय असा स्प्रे मारलाय की तुम्हाला ज्यांनी जपलं, त्यांनाच तुम्ही संपवायला निघालात. ज्या शिवसेनेने आणि शिवसेनाप्रमुखांनी बाबरी पतनाची जबाबदारी घेतली होती त्या शिवसेनेलाच तुम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हणत संपवायला निघालात? ‘त्यांची भूकच भागत नाही, या राक्षसी महत्त्वाकांक्षेला हावरटपणा म्हणतात’