मी लोकप्रतिनिधी असून माझी सर्वात आधी बांधिलकी मतदारसंघातील जनतेशी आहे. मी शिवसेनेच्या चिन्हावर जरूर निवडून आलो पण तेव्हा शिवसेना-भाजपा एकसंघपणे मला ताकद देण्यासाठी होती. महाविकास आघाडी अनैसर्गिक युती आहे असं नाना पटोले म्हणतात. हाच धागा प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात होता. स्थानिक पातळीवर शिवसंपर्क अभियानातून शिवसैनिकांच्या भावना संपवून घेतल्या. शिवसैनिकांमध्ये प्रचंड खदखद होती. त्या भावना नेतृत्वापर्यंत पोहचवल्या परंतु काही कारणास्तव निर्णय झाला नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वाट करून दिली. त्यातून नवीन समीकरण तयार झाले असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.
धैर्यशील माने म्हणाले की, मतदारसंघात निधीचा तुटवडा निर्माण झाला होता. आता राज्य आणि केंद्र सरकार एकत्र आल्याने मतदारसंघात जास्तीत जास्त निधी मिळेल याच भावनेतून अनेक लोकप्रतिनिधी इकडे आले. माझ्या मतदारसंघात सुचवलेली जी कामे होती त्यातील केवळ एकच काम पर्यावरण खात्यामार्फत झाले.
तसेच ठाकरे कुटुंब माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आदित्य ठाकरेंनी प्रयत्न केले असतील परंतु तीन पक्षाचे सरकार असल्याने कामाचं प्रत्यक्षात निकाल येऊ शकला नाही. राजकारणापलीकडचा जिव्हाळा असल्याने भावूक होतोय. ज्या भावना आमच्या आहेत त्याच ठाकरेंच्या आहेत. आजची परिस्थिती संपावी यासाठी मी काम करत होतो. आयुष्यभर कृतज्ञता ठाकरे कुटुंबीयांशी राहणार आहे असं त्यांनी सांगितले.