Latest Marathi News

BREAKING NEWS

“शिंदे सरकारच्या दबावामुळे अजिबात डगमगणार नाही,” नितीन देशमुख चौकशीला जाणारा सामोरे

0

ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांप्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार नितीन देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार आज आमदार देशमुख हे अमरावतीच्या एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर होणार आहेत.

चौकशीला हजर राहण्याअगोदर नितीन देशमुख यांनी,”आपण शिंदे सरकारची चौकशी आणि कारवाईमुळे अजिबात डगमगणार नाही,” असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. आमदार नितीन देशमुख यांच्या आजच्या चौकशीनिमित्त ठाकरे गटाकडून मोठं शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीन देशमुख अकोल्यातील त्यांच्या कार्यालयातून अमरावतीकडे प्रयाण करणार आहेत. अकोल्यातून जवळपास 700 कार्यकर्ते देशमुखांसोबत अमरावती इथे जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तानाट्यामध्ये शिवसेनेत फूट पडली. यावेळी अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनीही सुरत गाठले होते. यावेळी प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना सुरत इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होते. त्यावेळी आमदार नितीन देशमुख यांचे नाव राज्यात चर्चेत आले होते.इतकंच नाही तर नितीन देशमुख शिंदे गटासोबत सूरतमध्ये असताना त्यांच्या पत्नीने अकोल्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. नितीन देशमुख हे शिंदे गटासोबत गुवाहाटी इथे देखील गेले होते. परंतु गुवाहाटीवरुन ते नागपूरमार्गे अकोल्यात परतले.

Leave A Reply

Your email address will not be published.