राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार राजकीय घडामोडी घडताना दिसून येत असून एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केले तसेच मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. मात्र शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे, असे विधान माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी केले होते. यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केले आहे.
शिंदे सरकारमध्ये कोणतीही अस्थिरता नाही आहे. बच्चू कडूंना त्याची कल्पना आहे. १७० आमदारांचे बहुमत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठिशी आहे. त्यामुळे कोणत्या अर्थाने अस्थिरता असल्याचे म्हटले याबाबत कोणतीही कल्पना नाही,असे देसाई म्हणाले.
शिंदे सरकारसोबत महाविकास आघाडीत अस्थिरता असल्याचंही विधान बच्चू कडू यांनी केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.विरोधीपक्षात कोणतीही अस्थिरता नाही आहे. सत्तारूढ पक्षात अस्थिरता असल्याचं महाराष्ट्र पाहतोय. तसेच, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे पाटील म्हणाले.
तसेच मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांनी भाष्य केले.धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. म्हणून मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे ही सुनावणी पार पडल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता बच्चू कडू यांनी व्यक्त केली.