माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना अनेक राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली. विशेष म्हणजे संजय राऊत हे काल नाशिकच्या दौऱ्यावर होते. मात्र संजय राऊत मुंबईला परताच ठाकरे गटातील तब्बल ११ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.
याबाबत प्रतिक्रिया विचारली असता संजय राऊत संतप्त झाल्याचे दिसून आले. शिंदे गटात गेलेले नाशिकचे माजी नगरसेवक दलाल आहेत. ज्यांचे सरकार तिकडे ते जातात. मात्र २०२४मध्ये हेच दलाल नगरसेवक आमच्या दारात उभे असतील, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. राऊत यांच्या या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फूटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून उद्या काढण्यात येणाऱ्या महामोर्च्याला अद्यापही परवानगी मिळाली नसल्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकारने आमच्या मोर्च्याला अद्यापही परवानगी दिलेली नाही. मोर्च्याला परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करेल असे मला वाटत नाही. मात्र लोकशाहीच्या मार्गाने काढण्यात येणाऱ्या मोर्च्याला परवानगी नाकारली तर तुम्ही महाराष्ट्रद्रोही ठराल. खरतर सरकारमधील लोकांनी मोर्चात सामील होणे गरजेचे आहे.
एकीकडे महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान सुरु आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सीमाप्रश्नाबाबत फुरफुरत आहेत. राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. हा महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय असल्याचे संजय राऊत म्हणाले. परवानगी नाकारली तर त्याचे फार मोठे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेत उमटतील असा इशाराही राऊतांनी सरकारला दिला.