माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटाने काही महिन्यांपूर्वी जो राजकीय उठाव केला त्यामुळे राज्यात राजकीय अस्थिरता वाढली, असे मत आमदार बच्चू कडू यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कमालीची राजकीय अस्थिरता दिसते. याबाबत आमदार बच्चू कडू यांना विचारले असता. त्यावर बच्चू कडू यांनी हे मत व्यक्त केले.
गेल्या काही दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्याने बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच त्यांनी केलेल्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावेळी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, ‘राज्यात सध्या राजकीय अस्थिरता असून ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशा दोन्हींकडे आहे.
सत्ताधाऱ्यांसाठी न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मोठा उठाव झाला आणि शिंदे गट निर्माण झाला. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मुळात या सगळ्याचा फटका सर्वसामान्यांना बसला असून जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्यात लवकर राजकीय स्थिरता यावी अशी आमची इच्छा आहे.’ असे मत बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आमदार बच्चू कडू यांना विचारले असता, एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, ‘धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. ही सुनावणी पार पडली की मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.’ असे यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले.