आज देशात रस्ते, महामार्गाचे जाळे निर्माण होत आहे. त्यांचा उपयोग करून शेतकऱ्यांना सुखी, समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी काही मूलभूत कामे तसेच संशोधन करून मार्ग काढावा. कारण शेतकरी, विद्यार्थी आणि महिला या तीन घटकांच्या उत्थानावरच समाजाचे कल्याण अवलंबून असते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २५वा दीक्षांत समारंभ दि. २४ फेब्रुवारीला विद्यापीठात थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती, राज्यपाल रमेश बैस, तर प्रमुख पाहुणे म्हणून होमी भाभा राष्ट्रीय संस्था अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांची आभासी उपस्थिती होती. यावेळी विद्यापीठाच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांना डी.लिट प्रदान करण्यात आली. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना गडकरी यांनी, देशाचे भविष्य हे युवकांच्या हाती असून, त्यांनी चांगले गुण मिळविण्यासोबतच चांगले नागरिक होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी नोकरी मिळविण्यापेक्षा नोकरी देणारे झाले पाहिजे. या देशातील आजही अनेक नागरिकांना घर नाही, अन्न नाही. अशा लोकांच्या जीवनात तुम्ही प्रकाश बनून आले पाहिजे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदल कसा होइल, हा विचार केला पाहिजे. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, यासाठी संशोधन केले पाहिजे. तुमचे ज्ञान हे समाजासाठी उपयोगी आले पाहिजे.
माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम म्हणाले, शिक्षणाने बौद्धिक स्वावलंबन व आर्थिक स्वावलंबन निर्माण झाले पाहिजे. शिक्षण म्हणजे केवळ पदवीचा कागद नाही. शिक्षण म्हणजे संस्कार. तुमचा आचार, विचार व समाजातील व्यवहार हा संस्कारातून प्रकट होतो. तुमचे शिक्षण तुमच्या व्यक्तिमत्त्वातून प्रकट होते. जागतिकीकरणाच्या लाटेत कौशल्ये तरुणांना आत्मसात करता यावीत, यासाठी पोषक वातावरणनिर्मिती करणे मोठे आव्हान आहे.