‘राज्यकर्त्यांनी सुद्धा संपुर्ण देशाच्या प्रांताकडे बघताना देशाचे नेतृत्व करतो असा दृष्टीकोन पाहिजेत. देशाचा पंतप्रधान सरकारी कार्यक्रमात विरोधकांवर टीका करतो हे कितपत शहाणपणाचं आहे याचा विचार केला पाहिजे’, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबई यशवंत चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
तसेच यावेळी समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती, त्यावर पवारांनी भाष्य केलं. ‘आज आपण अडचणीच्या काळातून जात आहोत.समृद्धी महामार्गाला विरोध केला असं बोलले कोणी विरोध केला. राज्यकर्त्यांनी सुद्धा संपुर्ण देशाच्या प्रांताकडे बघताना देशाचे नेतृत्व करतो असा दृष्टीकोन पाहिजेत.
तुम्ही तुमच्या पक्षाच्या कार्यक्रमाला गेला आणि तिथे विरोधकांवर टीका केली, ती समजू शकतो. पण शासकीय कार्यक्रमाला गेला, रेल्वेचं उद्घाटन केलं, मेट्रोचं केलं, अशा ठिकाणी देशाचा पंतप्रधान सरकारी कार्यक्रमात विरोधकांवर टीका करतो हे कितपत शहाणपणाचं आहे याचा विचार केला पाहिजे’ असा सल्लावजा टोला पवारांनी पंतप्रधान मोदींना लगावला.
जे शाही फेकणे झाले ते योग्य नाही, याचं समर्थन मी करणार नाही. त्यांनी जर हे बोलले नसतं तर हे झालं नसतं. शब्द काय वापरला भीक, हे कुणालाही पसंद पडणारे नाही. कर्मवीर भाऊराव यांच्या संस्थेत कमवा आणि शिका योजना आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्ती मंत्री झाले हे काय फक्त तुम्हीच आहात का? सुसंस्कृतपणा जपू याची काळजी घेऊ, असा सल्ला पवारांनी चंद्रकांत पाटील यांना दिला.