Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीची बैठक; मोठे निर्णय घेणार

0

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड विजय मिळाला आहे. तर भाजपचा दणकून पराभव झाला आहे. त्यामुळे विरोधकांचं बळ वाढलं आहे. कर्नाटकातील विजयानंतर महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यानंतर आज महाविकास आघाडीने एक तातडीची बैठक बोलावली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मोठे निर्णय घेतले जाणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच त्याचं सुतोवाचही केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीकडून स्वत: शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तसेच काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहे. दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असावा? यावर आज महाविकास आघाडीच्या बैठकीत प्राथमिक चर्चा होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी आता अवघे 10 महिने राहिले असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यूहरचना आखण्यास तयारी सुरू केली आहे. जागा वाटपातील संभाव्य मतभेदांमुळे महाविकास आघाडीत फूट पडून त्याचा भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना निवडणुकीत फायदा होऊ नये यासाठी आतापासूनच महाविकास आघाडीचे नेते सावध आहेत, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.