शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीलाही बंडाचा फटका !
फडणवीसांनी ठाकरें पाठोपाठ पवारांना ही दिला झटका !
आता राज्याला दोन उपमुख्यमंत्री अजितदादांसह राष्ट्रवादीच्या नऊ शिलेदारांनी घेतली मंत्री पदाची शपथ !
राष्ट्रीय पक्षांनी घेतला प्रादेशिक पक्ष नामशेष करण्याचा ध्यास !
भाजपाच्या म्यानात अजितदादांची तलवार बसणार का ?
मुख्यमंत्री शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांवर विधानसभा अध्यक्षांकडून अपात्रतेची कारवाई होण्याचा ही घेतला शिंदे गटाने धसका !
मंत्रीपदाची स्पर्धा आता अधिक वाढली !
उद्धव ठाकरेंबरोबरच शरद पवारांपूढेही आता राजकीय पुनमांडणीचे आव्हान !
बार्शी/सचिन अपसिंगकर –
सन २०१९ सालची विधानसभा निवडणूक झाल्यापासून राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या नव्या राजकीय प्रयोगांमध्ये आता आणखी एका सत्तांतराची भर पडली आहे. भले हे सत्तांतर राज्यातले विद्यमान सरकार बदलणारे नसेल पण राष्ट्रवादी मधील संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात असलेली पक्षाची सत्ता या प्रायोगामुळे त्यांच्या पुतण्याकडे गेली आहे. 30 जून, 2022 रोजी शिवसेनेतील चाळीस आमदार फोडून एकनाथ शिंदे गोवा-सूरत-गुवाहाटी मार्गे परत मुंबईला आले आणि मुख्यमंत्री होऊन सत्तारूढ झाले. आज 02 जुलै, 2023 रोजी या राजकीय नाट्याला एकवर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे काही आमदार बरोबर घेऊन अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आणि अर्थातच शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सर्वच राजकीय पक्षांचे ध्येय हे सत्ता प्राप्ती झाली आहे. राजकीय नेत्यांनाही कायम सत्तेच्या सिंहासनावर बसायला आवडते. सन 2000 ते 2014 अशी पंधरा वर्ष सलग राज्याच्या राजकारणात कॅबिनेट मंत्री आणि उपमुख्यमंत्री पद भूषविलेल्या अजितदादांना गत वर्षभराचा सत्तात्याग रुचला नाही. अजितदादांच्या या भूमिकेला त्यांच्या राजकीय असंतोषाची मोठी पार्श्वभूमी आहे. सन 2019 साली दादांनी फडणवीसांबरोबर पहाटेचा शपथविधी उरकला होता. त्यावेळेला दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली खरी पण त्यांना राजकीय माघार घ्यावी लागली होती. अर्थात त्यावेळी राज्यामध्ये वैचारिक दृष्ट्या टोकाचे तीन पक्ष म्हणजे शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आले आणि भल्याभल्यांना आ-वासायला लावणारा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सत्तेवर आला. अडीचवर्षानी एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर हे सरकार कोसळले. आणि तत्कालीन शिंदेगट व आताच्या शिवसेना-भाजपा हे सरकार सत्तेवर आले. गेले वर्षभर विधिमंडळात विधानसभेचे विरोधीपक्षनेते पद भूषविणारे अजितदादा अस्वस्थ असल्याची चर्चा रंगत होती. अजितदादांचे पक्षाच्या महत्वाच्या बैठकांना अनुपस्थित राहणे, त्यांचे अचानक नॉट रीचेबल होणे, त्यांचे विरोधीपक्ष नेते म्हणून राज्य सरकारच्या धोरणा विरोधात मौन बाळगणे, यांचे विविध तर्क-वितर्क काढले जात होते. अखेर आज अजितदादा ही राष्ट्रवादीची भूमिका आहे असे सांगत फडणवीस यांच्या खांद्याला-खांदा लावून राजभवनात आले आणी पुतण्याने काकांना धोबी पछाड घातली हे सर्वांच्या लक्षात आले.
अजितदादांनी घेतलेली ही राजकीय भूमिका ही शरद पवारांना विचारात आणि विश्वासात घेऊन घेतलेली भूमिका नाही हे सर्वांच्याच चटकन लक्षात आले. कारण ही भूमिका शपथविधी समारंभापूर्वी जाहीर करण्यात आली नाही. शपथविधी समारंभावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे या समारंभाला नव्हत्या. मात्र दुसरे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती मात्र सर्वांच्याच भुवया उंचवणारी आहे. अजितदादांनी शपथविधी नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगीतले. त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण उद्यापासून पक्ष बांधणीसाठी राज्यात फिरणार असल्याचे सांगितले. आपल्याला अशा घडामोडी नव्या नाहीत हे शरद पवार म्हणतात हे पूर्णत: खरे आहे. शरद पवारांनी विधिमंडळात अचानक घुमजाव करत तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विश्वासघात केला आणि पुलोदचा प्रयोग केला. नंतर पवारांनी औरंगाबादमध्ये राजीव गांधींच्या उपास्थितिमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1999 साली त्यांनी सोनिया गांधींच्या परदेशीपणांचा मुद्दा लावून धरत राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. त्याच कॉंग्रेस बरोबर त्यांनी परत तीनवेळा सत्तेमध्ये सामील होण्याची तडजोड केली. पक्षांतर आणि सत्तांतर पवारांना नवे नाही. सुप्रिया सुळेंचे नेतृत्व पक्षात रुजवताना अजितदादांच्या मनात बंडाची बीजे पेरली जात आहेत, याची पवारांना पूर्ण कल्पना होती. पण सुप्रिया सुळेंचे नेतृत्व पक्षात स्थिरवण्या अगोदरच त्यांना शह देणे हे अजितदादांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या समर्थकांची राजकीय गरज होती. फडणवीसांनी अजितदादांची पक्षातली गळचेपी बरोबर ओळखली, त्यांच्या राजकीय महत्वकांक्षेला फुंकर घातली, खतपाणी घातले आणि अखेर अजितदादा भाजपात सामील झाले.
यासर्व 2019 पासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि ऑपरेशन लोटसचा केंद्रबिंदू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर जाणे काय आणि अजितदादा पवारांचे शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी होणे काय या सर्व राजकीय ध्रुवीकरनामध्ये देवेन्द्र फडणवीस यांच्या मोर्चे बांधणीला विशेष महत्व आहे. महाविकास आघाडी सरकार पाय उतार करताना फडणवीस यांनी केलेल्या राजकीय कसरती पाहिल्यातर त्यांनी शरद पवारांच्याही पुढे जाऊन दोन डाव अधिक खेळल्याचे स्पष्ट दिसते आहे.
अजितदादांसह आज मंत्रीपदाची शपथ घेणार्यां्मध्ये आजपर्यंत अजितदादांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी मानले जाणार्या छगन भुजबळांचाही समावेश आहे. भाजपा सरकारच्या काळात पूर्वी भुजबळांनी तुरुंगाची वारी केली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये आऊट घटकेचे का होईना पण गृहमंत्रीपद भूषविलेले दिलीप वळसे-पाटील यांनीही दादांना साथ दिली आहे. मुंडे, तटकरे, बनसोडे, अत्राम, पाटील, हे अजितदादांचे निकटवर्तीय असले तरी हसन मुश्रीफांसारख्या सध्या बँकेच्या निमित्ताने चौकशी मागे लागलेल्या व्यक्तीचा समावेश ही धक्का दायकच आहे. ईडी, सीबीआय, अॅंटीकरप्शन या सरकारी तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लावून विरोधकांना मुसकटदाबी करून भाजपात येण्यास भाग पडले जाते. आणि भाजपामध्ये आल्यानंतर त्यांचे शुद्धीकरण होते, अशी बोचरी टीका नेहमी भाजपा विरोधक करतात. या आरोपांना आता पुष्टी मिळते आहे. यासर्व घडामोडी घडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राष्ट्रवादीचा भ्रष्टाचारी म्हणून केलेला उल्लेख सिंचन घोटाळ्याचा आरोप आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठनेत्यांनी भाजप प्रणीत सरकारमध्ये सहभागी होणे, सुद्धा भाजपाच्या राजकीय प्रतिमेला पुरते हरताळ फासणारे आहे. सत्ताकारणाच्या दुष्टचक्रामध्ये सापडून प्रवाह पतीत झालेला पक्ष अशी स्वत:ला विचाराधीष्टीत आणि शिस्तबद्ध तत्वनिष्ट पक्ष म्हणणार्याण भाजपाची अवस्था झाली आहे. ज्यांनी विचारधारा पाहून मतदान केले, पक्ष पाहून मतदान केले, त्या सामान्य मतदाराला मात्र राजकीय वस्त्रहरणातून शोध आणि बोध घ्यावा लागेल.