कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट सांगली जिल्ह्यातील जतवर दावा सांगितल्याने वातावरण पुन्हा चिघळले. राज्यकर्त्यांपासून विरोधकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना धारेवर धरले आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते शरद कोळी यांनी बोम्माई यांना थेट इशारा दिला आहे. शरद कोळी यांनी सीमाभागातील गावं सोडा, साधा खडा उचलला तरी तंगड्या तोडू, असा इशारा मुख्यमंत्री बोम्माई यांना दिला आहे. त्यामुळे आता हा वाद पुन्हा पेटणार असल्याचे चिन्ह आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद हे भाजपचं षडयंत्र असल्याच टीकाही कोळी यांनी केली. हा वाद आताच उकरुन काढण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री बोम्माई यांनी सीमावर्ती भागातील गावांच्या पाणी प्रश्न सोडविण्याची भूमिका घेतली होती. बोम्मई यांनी दोन दिवसांपूर्वी सीमावर्ती भागातील कन्नड शाळांना विशेष अनुदान देण्याचीही घोषणा केली होती.
एवढेच नाहीतर ज्या कन्नड भाषिकांनी गोवा मुक्तीसाठी, स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि एकीकरण चळवळीसाठी योगदान दिले, त्यांना पेन्शन लागू करण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यभरातून कन्नड सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यात येत आहे. बेळगाव, निपाणी, भालकी येथील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकार अन्याय करत आहे. त्याविरोधात अनेक वर्षांपासून शिवसेना आणि इतर पक्ष जोरदार आंदोलन करत आले आहेत. यादरम्यान मराठी नेत्यांना अनेकदा लक्षही करण्यात आले आहे. पण कर्नाटक सरकारने आता थेट जत तालुक्यातील 40 गावांवर दावा ठोकल्याने सर्व सातारवरून संतापाची लाट उसळली आहे.