मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरही टीका होत आहे. आज सभागृहात हा विषय उपस्थित केला असताना धनंजय मुंडे तिथे गैरहजर होते, यावरूनही मोठी चर्चा रंगली. अखेर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर मौन तोडत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“माझ्या सहकाऱ्याच्या संबंधात चर्चा सुरू होती, त्यावर उत्तर मुख्यमंत्री देणार होते, त्यामुळे प्रथा परंपरेनुसार मी सदनात उपस्थित राहिलो नाही. मी उपस्थित राहिलो असतं त्यांना उत्तर देताना अडचण झाली असती. त्यामुळे एकदाच दूध का दूध पाणी का पाणी होऊन जावं म्हणून मी सभागृहात हजर नव्हतो, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
“मी आधीपासूनच सांगतो आहे की हे प्रकरण व्यवहारातून घडलेले आहे. संतोष देशमुखांची अत्यंत क्रूर हत्या झाली आहे, आणि अशा हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही. सर्व आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत आमच्या सर्वांच्या तीव्र भावना आहेत. सध्या एसआयटी स्थापन करण्यात आली आहे, त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होईल. अलीकडेच संतोष देशमुख यांचा भाऊ, गुन्हेगार आणि पोलीस अधिकारी एकत्र चहा पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याचीही चौकशी होणार आहे,” असे धनंजय मुंडे म्हणाले.
“माझ्या नावाशी आरोप जोडणं असे प्रकार सदनात अनेकदा घडले आहेत. विरोधी पक्षनेत्याने काय बोलावं हे मी सांगू शकणार नाही. पण अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराड कुठे आहेत हे सांगितलं असतं तर तर त्यालाही अटक केली असते”, असंही ते म्हणाले.
अंबादास दानवे यांनी काय म्हणाले?
या हत्या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड असल्याचा आरोप दानवे यांनी केला. तो एका मंत्र्यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता आहे. नागपूरमध्ये वास्तव्य असताना पोलिसांनी त्याला अटक का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच आरोपींना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.