पुणे | मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. पुण्यात एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. ८० च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीतील हँडसम हंक म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली होती आता त्यांच्या निधनावर मराठी चित्रपट सृष्टीतुन प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी वृत्त वाहिनी बोलतांना मराठी चित्रपटसृष्टीने एक देखणा नट गमावला, असं म्हणत दुःख व्यक्त केल आहे. ते पुढे म्हणाले,’खूप वाईट घडलंय. आमच्या पिढीतला एकमेव देखणा नट गेला, असं मला वाटतं. तो हिरो आणि मी साईडला असे बरेच चित्रपट आम्ही एकत्र केले. आम्ही यशस्वी चित्रपट केले आहेत. एक चांगला माणूस, एक चांगला मित्र गेल्याने खूप दुःख होतंय.
महाजनी यांच्या जाण्याने एक चांगला नट, मित्र गमावल्याचं दुःख मनात कायम राहील. नेहमी हसत खेळत वावरणारा, हसमुख चेहऱ्याचा नट होता. प्रामाणिकपणा हा त्याच्यातला सर्वात मोठा गुण होता, तो प्रत्येक भूमिका उत्तम करायचा. जे करायचा ते मन लावून करायचा, त्यामुळे तो त्या काळातला एक यशस्वी नट होता,” अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केली आहे.