कधीकाळी ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून ओळख असलेल्या दीपाली सय्यद यांनी आज अखेर ठाकरे गट सोडण्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा करतानाच त्यांनी ठाकरे गटासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला. रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला. ते आज माध्यमांशी बोलत होत्या.
मी येत्या शनिवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करत असून त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी आले आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे जी जबाबदारी दिली जाईल, ती स्वीकारण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेची साथ सोडण्याचं कारण विचारण्यात आलं असता त्यांनी याचे खापर संजय राऊतांवर फोडले. संजय राऊतांना आपल्या पापाची शिक्षा मिळाली. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचे संजय राऊत हे उत्तम उदाहरण आहे. त्याच्यामुळे गोष्टी घडत गेल्या आणि शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत.
एकनाथ शिंदेंनीच मला शिवसेनेत आणले असल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. रश्मी ठाकरेंना मुंबई महापालिकेतील खोके ‘मातोश्री’वर येणं बंद झाल्याची मोठी खंत आहे. निलम गोऱ्हे, सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. खऱ्या सूत्रधार रश्मी ठाकरे आहेत, असा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांनी केला. आता या टीकेला ठाकरे गट काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.