राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर (टीकास्त्र सोडले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात रीदा राशिद या भाजप महिला पदाधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी विनयभंगाची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांच्याविरोधात ३५४ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याबाबत बोलताना पुन्हा एकदा आव्हाड म्हणाले, सामान्यपणे न लागणारे कलम जेव्हा माझ्यावर लावले, तेव्हाच स्पष्ट झाले होते की पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर काम करतो, त्याला कायद्याचे पूर्ण त्रान असते. जो गुन्हा बसत नाही, तोही लावायला कचरतात. माझ्यावर लावलेला ३५४ हा गुन्हा कधीही लागू शकत नाही, हे पोलिसांना माहिती होते; परंतु तरीही मुस्लिम महिलांना पुढे करून त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, राजकीय सूडापोटी ही कारवाई सुरू आहे. सत्ता आहे, त्यामुळेच हा प्रकार घडतोय, असेही आव्हाड म्हणाले. माझ्यावर एफआयआर दाखल करताना एक मिनिटाचाही वेळ घेतला नाही. तर ज्या महिलेने आरोप केले, तिच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी चार दिवस घेतले. दरम्यान, आंदोलन झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिंदे-भाजप सरकारने नगरपालिका-महानगरपालिका निवडणुकांसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना रद्द करण्यात येईल? याबाबत बोलताना आव्हाड म्हणाले, मागच्या प्रभाग योजनेच्या वेळी आजचे मुख्यमंत्री हे तेव्हाचे नगर विकास मंत्री होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया झाली होती. मात्र पुन्हा जर प्रभाग रचना होत असेल तर महाराष्ट्राचे १५०० कोटी पाण्यात गेले.