रत्नागिरी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ६ दिवसीय कोकण दौऱ्यात रत्नागिरी दौऱ्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका कार्यालयांचे उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर आता जिल्हापरिषद गटानुसार पक्ष कार्यालयाचा उदघाटनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे . यामुळे कोकणात मनसे पक्षाला अधिक बळ मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचातीच्या निवडणुकीत सुद्धा मनसेने चांगलेच यश संपादित केले होते अशातच आता प्रत्येक गावा-गावात मनसे पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी गावांमध्ये शाखा उघडणार असल्याचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौऱ्यावेळी बोलून दाखविले होते. याच पार्श्वभूमीवर आता राजापूर अणसुरे येथे मनसे शाखेचा उदघाटन सोहळा पार पडणार आहे.
येत्या रविवारी 19 फेब्रुवारी २०२३ रोजी मनसेच्या नव्या शाखेचा उदघाटन सोहळा मनसे उपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष श्री सतीश नारकर, श्री अविनाश सौंदळकर (द.रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष) तसेच श्री अमोल साळुंखे (महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना, अध्यक्ष रत्नागिरी सिंधुदुर्ग) यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी स्थायिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली असून मुंबईत राहणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना सुद्धा या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काही दिवसांनी संपूर्ण राज्यभरात पार पडणाऱ्या स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने सुद्धा जोरदार तयारी सुरु केल्याचे चित्र दिसून येत आहे. आज स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांची नेमणूक तसेच मुंबईस्थित कोकणवासीयांची मेळावे त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात पार पडत असलेल्या नव्या मनसे शाखांचे उदघाटन या सर्व बाबींमुळे येत्या स्थानिक निवडणुकीला मनसेला भरघोस यश मिळेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे तसेच येत्या काही दिवसात कोकणात अधिक शाखांचे जाळे पसरवण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा समोर येत आहे.