रायगड : महायुतीतील तिन्ही पक्षांच्या जीवनातील राजकीय परीक्षेची ही कसोटी आहे. त्या कसोटीला आपण निश्चितपणे उतरु.
राजकारणात फेरबदल होत असतात. समीकरणे बदलत असतात. आपण राजकीय विरोधक यावेळी एकत्र आलो आहोत हे नवीन राजकारण देशाच्या हिताचे आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा निवडणूक लढली जातेय तर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदा निवडणूक लढतोय. तरी, या लोकसभा निवडणुकीत ९० टक्क्याच्या पुढे परीक्षेत पास होणार आहोत आणि विधानसभेच्या परीक्षेत दोन टक्के जास्त पास आपण होणार आहोत, याबाबत कोणाच्याही मनामध्ये संभ्रम असता कामा नये. असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेस, महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी केले.
महायुतीची जाहीर सभा निजामपूर येथे हजारो जनसमुदायासमोर पार पडली यावेळी तटकरे बोलत होते.
पुढे बोलताना तटकरे म्हणाले, एकच उद्दीष्ट तुमचं – माझं समान आहे की, या भागातील विकासाच्या कामाला ताकदीने तुम्ही – आम्ही केंद्र व राज्य सरकारच्या योजना एकत्रितपणे राबवायच्या हे धोरण घेऊन आपण पुढच्या कालावधीत काम करत राहूया.
एनडीएमध्ये आणि राज्यात महायुतीमध्ये आम्ही सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सत्ता लोकांच्या हितासाठी, दुर्गम भागातील लोकांना न्याय देण्यासाठी, त्यांचा वापर करण्यासाठी नाही असेही ठणकावून सांगितले. या लोकसभा निवडणुकीत जेवढे मताधिक्य मिळेल त्यापेक्षा जास्त मताधिक्य भरतशेठ गोगावले यांना विधानसभेत देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन तटकरे यांनी दिले.
गीते दहा वर्षे केंद्रीय मंत्री; पण एखादं काम त्यांना दाखवता येत नाही ही शोकांतिका
निजामपूर येथे झालेली ही प्रचंड सभा झाल्यानंतर अनंत गीते इथे सभा घेण्याचे धाडस करतील की नाही याबद्दल शंका असून जरी त्यांनी सभा घेतली तरी ती कुठल्यातरी गल्लीत घेतील असे सांगताना तटकरे म्हणाले, अनंत गीते यांना ३० वर्षे संसदेत काम करण्यासाठी पाठवले होते. ते दहा वर्षे केंद्रीय मंत्री होते पण त्यांनी केलेले एखादं काम त्यांना दाखवता येत नाही ही त्यांची शोकांतिका आहे. या सगळ्या परीसरातील लोकांची पाण्याची तहान भागवली जाईलच पण नवीन नवीन जे रोजगार या परिसरात निर्माण होत आहेत शिवाय जो पर्यटक पुण्याकडे निघालेला आहे तो या ताम्हीणी घाटातून खाली येतोय त्याला विसाव्याचे चांगले ठिकाण निजामपूर आणि परिसरात निर्माण करण्याची बांधिलकी घेऊन आपण सर्वजण मिळून कामाला लागूया. आपल्या एका हाकेवर रणरणत्या उन्हात इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय येतो इतकं प्रेम आपण लोकांकडून कमवलं आहे त्या प्रेमाचे उतराई होण्याचे काम सामुदायिकरित्या विकासकामांच्या रुपाने करुया असा शब्द सुनील तटकरे यांनी शब्द दिला.