Latest Marathi News

BREAKING NEWS

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

0

यवतमाळ,२८ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज यवतमाळच्या भारी या परिसरामध्ये सभा पार पडली. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांचे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना मोदी यांनी यूपीए सरकारच्या काळातील कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसह महिलांना कोणत्याही योजनेचा पूर्ण लाभ मिळत नव्हता. विशेष करून २०१४च्या आधी महाराष्ट्रातील कृषीमंत्री केंद्रत होते. तेव्हा केंद्रात युपीएचे भ्रष्ट सरकार होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कधीच थेट लाभ मिळाला नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्रात जेव्हा युपीए सरकार होते तेव्हा तेव्हाची स्थिती काय होती. तेव्हा कृषीमंत्रीही महाराष्ट्राचेच होते. त्यावेळी दिल्ली ते विदर्भातील शेतकऱ्यांच्या नावावर पॅकेज जाहीर व्हायचे. पण मध्येच लुटले जायचे. गाव, गरीब, शेतकरी, आदिवासींना काही मिळत नव्हते. आज मी एक बटन दाबले आणि पीएम किसान योजनेचे २१ हजार करोड रुपये शेतकऱ्यांच्या खातेवर पोहोचले. ही तर मोदींची गॅरंटी असल्याचे ते म्हणाले.
केंद्रात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा दिल्लीतून एक रुपया निघायचा तर १५ पैसे पोहोचत होते. जर काँग्रेसची सरकार असते तर शेतकऱ्यांना २१ हजार करोड मिळाले आहेत, त्यातील १८ हजार करोड मध्येच लुटले असते. पण आता भाजपाचे सरकार असल्याने गरीबांचा संपूर्ण पैसा गरीबांना मिळत आहे, अशी सडकून टीकाही पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली.

देशात पंतप्रधान मोदी यांची गॅरंटी आहे म्हणूनच तर देशातील प्रत्येक लाभार्थ्याला पैसे बॅंकेत मिळत आहेत. आता तर राज्यातील शेतकऱ्यांकडे डबल इंजिनची डबल गॅरंटी आहे. ही मदत सोडून आता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ३ हजार ८०० कोटी रुपये वेगळे ट्रान्सफर झाले आहेत. पीएम किसान योजनेतून १२ हजार प्रत्येक वर्षी मिळत आहेत. आत्तापर्यंत ११ हजार करोड शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ लाख करोड रुपये जमा झालेले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना ३० हजार करोड आणि यवतमाळच्या शेतकऱ्यांना ९०० करोड रुपये मिळाले असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.
विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या 10 वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला. देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे. त्यासाठी गरीब, युवक, शेतकरी व महिला या घटकांच्या सशक्तीकरणासाठी व्यापक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विकासप्रक्रियेला गती मिळून देशाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ, पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत देशातील 9 कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण 21 हजार कोटी रू. व महाराष्ट्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे 6 हजार 900 कोटी रू. चे वितरण, तसेच राज्यातील सुमारे पाच हजार कोटी रू. निधीतून रस्ते, रेल्वे व सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन, तसेच यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार भावना गवळी, खा.हेमंत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नीलय नाईक, मदन येरावार, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार,डॉ. संदीप धुर्वे, नामदेव ससाणे, इंद्रनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.