शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. आता परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती असलेले आमदार बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच वृत्त समोर आलं होत. परभणी जिल्ह्यातील 40 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर हा शिंदे गटाचे नेते सईद खान यांनी आमदार बाबाजानी दुर्राणी हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्या असून, एकमेकांवर कुरघोडी केली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेच आता शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा, खुलासा सईद खान यांच्याकडून करण्यात आला आहे.सईद खान यांच्या या खुलासानंतर परभणीच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
शरद पवारांचे निकटवर्ती असलेले बाबाजानी यांचे नाव पुढे आल्याने, सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु आपण शरद पवार यांचे समर्थक असून कायम त्यांच्याकडेच राहणार असल्याचा दावा बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे. शिंदे गटातील नेत्यांकडून करण्यात आलेल्या या दाव्यानंतर, परभणी जिल्ह्यातील एकूण राजकीय वातावरण तापले आहे. दावे आणि प्रति दावे रोजच्या रोज केले जातात, परंतु यातून नेमकं काय तथ्य बाहेर येत हे येणाऱ्या काळात समजेल.