बार्शी |
येथील मुकेश किसन वाघ यांच्यावर दिनांक २४ जून २०१९ रोजी प्राण घातक हल्ला झाला होता. त्याप्रकरणी अनिल शेळवणे, वसीम शेख, विशाल उर्फ बच्चन सातपुते व एक अनोळखी इसम यांच्या विरुद्ध न्या.श्री एस.बी.विजयकर यांनी पुढील तपास करून त्याबाबतचा अहवाल एक महिन्याच्या आत न्यायालयात सादर करण्याचे आदेश बार्शी शहर पोलिसांना दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, या प्राणघातक हल्ला दिनांक २४ जून २०१९ रोजी मुकेश किसन वाघ यांच्यावर झाल्यानंतर त्याबाबत बार्शी शहर पोलिसांत भा.द.वी ३०७, ३४१,३२४,३२३,५०४,५०६ व ३४ आर्म ॲक्ट ४ ,२५ प्रमाणे अनिल दत्तात्रय शेळवणे, वसीम शौकत शेख , विशाल उर्फ बच्चन सातपुते सर्व राहणार बार्शी व एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी फिर्यादी मुकेश वाघ यांच्या वतीने ॲड आकाश तावडे यांनी बाजू मांडताना तपासी अधिकारी यांनी राजकीय दबावात येऊन सदरचा तपास केला तसेच यातील आरोपीने त्यांचे निवेदनामध्ये स्वतः कबूल केलेले आहे, की सदर गुन्ह्यात दोन पेक्षा अधिक आरोपींचा सहभाग आहे. सदरच्या गुन्ह्यातील घटनास्थळ पंचनाम्यात चार आरोपींचा सहभाग असल्याचे नमूद आहे.
तपास अधिकाऱ्याने आरोपी विशाल उर्फ बच्चन सातपुते हा घटनास्थळावर नव्हता याबाबत सी.सी.टी.वी फुटेज जप्त करून त्याचे ६५ ब चे प्रमाण पत्र न्यायालयात दाखल केले आहेत, परंतु ते फुटेज असलेला पेन ड्राईव्ह न्यायालयात दाखल केलेला नाही.तसेच सदर गुन्ह्यातील नेत्र साक्षीदाराने देखील त्याच्या जबाबात दोन पेक्षा जास्त आरोपींचा सहभाग असल्याचे सांगितले असताना देखील त्यांचे म्हणणे दोषारोप पत्रात घेतले नाही, या सर्व बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देताच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री.एस.बी.विजयकर यांनी सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून तसेच विशेष अधिकाराचा वापर करत, तपास अधिकारी पोलिस नाईक संजय खैरे यांनी सी.आर.पी.सी १६९ प्रमाणे दोन आरोपींना वगळण्याचा न्यायालयात दिलेला अहवाल फेटाळून लावत पुढील तपास करण्याचे आदेश पारित केला आहे.
याप्रकरणी फिर्यादीच्या वतीने ॲड आकाश तावडे व ॲड सुहास कांबळे यांनी, तर आरोपीच्या वतीने ॲड अविनाश जाधव यांनी काम पाहिले