विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री शिंदेंच्या सोबत जाणे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून महिला आघाडीत नाराजीचे वातावरण होतं, त्यामुळेच गोऱ्हे यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांच्यासाठी सटरफटर हा शब्द वापरून टीका केली होती. या टीकेला आता अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले.माझ्यावर कोणीच टीका करत नाही. दररोज सकाळी चार-पाच कॅबिनेट मंत्री बोलतात एवढेच, आता त्यांचे काही वाटत नाही. मी सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले, ते म्हणाले, संकटकाळात जे किल्ला लढवतात तेच दिसतात. सोयीस्कर भूमिका घेतात त्या लोकांबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही.
सुषमा अंधारे म्हणाल्या, नीलमताईंनी सांगितले आहे की, त्या कोणावरही नाराज नाहीत. कारण नाराज होण्यासारखे काहीही कारण त्यांच्याकडे नाही. याचा दुसरा सरळ अर्थ असा की, समोर संधी दिसत असेल तर ती संधीचा फायदा घेतला पाहिजे. कारण संधी एकदाच दार ठोठावते. त्यांना संधी मिळाली आहे. वास्तविक पाहता पक्षानेही (ठाकरे गट) अनेकवेळा त्यांना संधी दिली आहे. त्यांना चार वेळा विधान परिषदेवर आमदारकी दिली. पक्षाने त्यांना परिषदेचे उपसभापती पद दिले, उपनेते पद दिले. त्यांनी वापरलेला सटरफटर हा शब्द माझ्यासाठी नव्हे तर सामान्य शिवसैनिकांसाठी वापरला आहे असेही त्या म्हणाल्या.