मुंबई | आजही आपल्या देशातील 56 ते 60 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. येणाऱ्या वर्षात चांगला पाऊस झाला तर हे वर्ष चांगलं जायला काही हरकत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांनी केलं. शेती संपन्न झाली तर बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती वाढते. शेतकऱ्यांच्या हातात पैसा गेल्यामुळं बाजारात जाऊन खरेदी करण्याची त्यांची ताकद वाढते. या नवीन वर्षात बळीराजा सुखी व्हावा, हीच प्रार्थना असल्याचे पवार म्हणाले. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामतीत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
बळीराजा यशस्वी झाल्यानंतर देशातील अन्य घटकांचे दिवसही चांगले येतात. त्यासाठी व्यापार उद्योगातही चांगले दिवस येणं गरजेचं असल्याचे शरद पवार म्हणाले. देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देश हा महत्वाचा निर्यातदार देश होऊ शकतो. त्यासाठी पहिल्यांदा उद्योग आमि व्यापारामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत असे शरद पवार म्हणाले. आज सत्तेवर कोणाही असो, अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वांना रजकीय मतभेत सोडून एकत्र यावं लागेल असं शरद पवार म्हणाले.
तसेच अर्थव्यवस्था नीट करावी लागेल. देशाचे अर्थकारण सुधारण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे, हे आपल्यापुढं नवीन वर्षात आव्हान असल्याचे शरद पवार म्हणाले. या आव्हानाला आपण सर्वजण सामोरं जाऊया असे पवार म्हणाले. संसदेचं हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नाही. सभागृहात गोंधळ करायचा. या गोंधळात हव्या त्या गोष्टी मंजूर करुन घ्यायच्या अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे शरद पवार म्हणाले.