खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे.सार्वजनिक मंचावरुन नारायण राणे यांनी खोटे आरोप केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. खुद्द संजय राऊत यांनीच ट्विटरच्या माध्यमातून राणे यांना पाठवलेल्या नोटीस बाबतची माहिती दिली आहे. नारायण राणे यांनी या नोटीसनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
राऊत म्हणाले की, माणसाने भाजपच्या नादाला लागून किती खोटे बोलावे याला ही काही मर्यादा आहेत. नारायण राणेंनी सतत माझ्याविषयी काही वक्तव्य केली आहेत. त्यामुळे मी त्यांना कोर्टाची नोटीस पाठवली आहे. नारायण राणेंनी या नोटिसीनंतर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्यावर खटला दाखल करेन. किरीट सोमय्यांवर देखील मी खटला दाखल करणार आहे. फक्त मीच नाही तर शिवसेनेच्या ज्या नेत्यांवर अशाप्रकारचे आरोप होत आहेत ते सर्व नेते खटले दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे
“नारायण राणे सार्वजनिक मंचावरुन तसेच माध्यमातून माझ्याविषयी आणि शिवसेनेबाबत बिनबुडाचे आरोप करीत असतात. हे आरोप त्यांनी सिद्ध करावेत. अन्यथा माफी मागावी. माझे वकील सार्थक शेट्टी यांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर कारवाईबाबत नोटीस बजावली आहे. कर नाही तर डर कशाला? जय महाराष्ट्र!”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. या नोटीसला राणे काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.