कोल्हापूर | हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने कारवाई केली होती अशातच कागल मधील विविध कामाच्या उदघाटनानिमित्त विरोधी पक्षनेते अजित कागल दौऱ्यावर आलेले असताना काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी या कारवाईच्या विरोधात मुश्रीफ यांच्या बरोबर असल्याचे विधान केले आहे.मुश्रीफ साहेब कोणत्याही संकटात आम्ही तुमच्या पाठीशी, काही काळजी करू नका, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी बळ दिले.
कागलमध्येआज विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार कागल दौऱ्यावर आहेत. यावेळी वाय. डी. माने सभागृहाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्यासह आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर आदी नेते उपस्थित होते. हे सभागृह राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या निधीतून उभारण्यात आलं आहे. या कार्यक्रमासांठी मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती होती.
गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या कारवाईने हसन मुश्रीफ अडचणीत आहेत. याच पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी त्यांना बळ दिले. ते म्हणाले की, मुश्रीफ साहेब कोणत्याही संकटात आम्ही तुमच्या पाठीशी, काही काळजी करू नका. संकट काळातही हा वाघ खंबीरपणे उभा राहील याची आम्हाला खात्री आहे. जिल्ह्याचे श्रावण बाळ म्हणून आपण काम केलं आहात. कागल हा मुश्रीफ यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे अजित पवार यांनीही कागल दौरा करत मुश्रीफांना बळ दिले आहे.
हसन मुश्रीफांशी संबंधित (Hasan Mushrif ED Raid) अवघ्या 21 दिवसांच्या अंतराने दोनदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. एका बाजूने हा धक्का असतानाच त्यांना आणखी एक धक्का काल बसला आहे. त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीन्यासाठी मुंबई सत्र न्यायालयामध्ये अर्ज केला होता. मात्र, या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ही परिस्थिती एका बाजूला असतानाच कागलमध्येही राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे.