पक्षादेश आल्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांना अखेरच्या क्षणी रिंगणातून माघार घ्यावी लागली आहे. आज अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती.
त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हाच सूर लावला होता. त्यामुळे गेल्या २४ तासांमध्ये राजकीय चक्रं फिरली आणि त्याची परिणती भाजपने मुरजी पटेल यांना अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा आदेश देण्यात झाली. या सगळ्यामुळे अंधेरीतील मुरजी पटेल यांच्या कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी नागपूर येथून मुरजी पटेल हे अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अंधेरीत मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
‘राज ठाकरे मुर्दाबाद’च्या घोषणांनी अंधेरी पूर्वचा परिसर दणाणून गेला होता. इतक्या दिवसांच्या प्रचारानंतर मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणे, ही बाब अनेक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली. त्यामुळे मुरजी पटेल यांचा एक कार्यकर्ता ओक्साबोक्शी रडायला लागला. तर अन्य एका कार्यकर्त्याने ‘सगळे चोर आहेत’, अशी संतप्त प्रतिक्रिया देत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. त्यामुळे आता मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांचा हा संताप कधी शमणार की याचे आणखी तीव्र पडसाद उमटणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.