Latest Marathi News

BREAKING NEWS

मुकादमाच्या छळातून ऊस तोडणी मजुरांची सुटका करा, राजू शेट्टी यांची मागणी

0

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी मजूर महामंडळाचे कामकाज गतिमान करून मुकादमाकडून मजुरांची होणारी पिळवणूक थांबविण्याची गरज आहे. यासाठी महामंडळाने मजुरांची नोंदणी करुन मजुरांचा वाहन मालकांना पुरवठा करण्याची गरज आहे. तसेच ऊस तोडणी मजुरांना शासनाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंतो भांगे यांच्याकडे केली.

सचिवांच्या भेटीनंतर राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकारांना माहिती दिली. शेट्टी म्हणाले की, राज्यामध्ये ऊसतोडणी मुकादमाकडून ऊस वाहतूकदार व ऊसतोडणी मजुरांची मोठी पिळवणूक केली जात आहे. गेल्या तीन ते चार हंगामात कारखान्यामार्फत ४४६ कोटी व थेट ऊस वाहतूकदार यांचेमार्फत जवळपास ६०० कोटी असे एकूण एक हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक ऊसतोडणी मुकादमांनी केली आहे.

याकरिता उपाययोजना म्हणून महामंडळाकडे ऊसतोडणी मजुरांची नोंदणी करून ऊस वाहतूकदार व कारखान्यांना मजूर पुरवठा करण्याचे धोरण राज्य सरकारने ठरविले आहे. शासनाकडून महामंडळाचे काम कासव गतीने सुरू असून याकरिता लागणारे अर्थसहाय्याची तरतूद कमी केली आहे. राज्यातील साखर कारखान्याकडून जवळपास ३८ कोटी रूपयांची कपात करून ही रक्कम महामंडळास वर्ग केली आहे. यावेळी स्वाभिमानी ऊस वाहतूकदार संघटनेचे नेते पृथ्वीराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा, प्रवीण शेट्टी, विनोद पाटील यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.