Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी | हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला ईडीचा विरोध

0

कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे, सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 35 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ईडीकडून मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हसन मुश्रीफ यांच्या नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे.अर्जात राजकीय हेतूनं अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईडीने तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनाला कडाडून विरोध करताना म्हटले आहे की, त्यांनी चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेलं नाही. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावूनही ते हजर झालेले नाहीत. जामीन दिल्याने चौकशीवर परिणाम होईल, असेही ईडीने म्हटले आहे. ईडीच्या या भूमिकेमुळे मुश्रीफांच्या मुलांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

हसन मुश्रीफ यांची मुलं सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात संचालक आणि भागधारक आहेत. प्राथमिक चौकशीत कारखान्याला मोठ्या प्रमाणात पैसा आला आहे आणि या पैशाच्या स्त्रोताविषयी कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही. हा पैसा अवैध मार्गाने आल्याचे ईडीने म्हटले आहे. दरम्यान, हसन मुश्रीफांच्या तिन्ही मुलांकडून वरिष्ठ वकील आबाद पोंडा आणि प्रशांत पाटील यांनी सत्र न्यायालयात बाजू मांडली. ईडीकडून हसन मुश्रीफ यांना टार्गेट करण्याचा मुख्य हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्याविरोधात कोणतेही गैरव्यवहार केल्याचे समोर आलं नसल्याचे सांगितले. ईडीने हे आरोप फेटाळून लावताना न्यायालयात दिशाभूल केली जात असल्याचे सांगितले. छापेमारी कायदेशीर मार्गाने झाल्याने ईडीने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.