कणकवली: शिवसेना खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत यांनी पोलिसांना शिवीगाळ करत हुज्जत घातल्याचा आरोप करत आ नितेश राणे यांनी संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध केला आहे. राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या गीतेश राऊतांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
संबंधित व्हिडीओमध्ये कणकवलीच्या एका चौकात गीतेश राऊत यांची गाडी पोलिसांनी अडवल्याचं दिसत आहे. यावेळी गीतेश राऊत आणि एका पोलिसात गाडी वळवण्यावरून वाद झाला. यावेळी, गीतेश यांनी दुसऱ्या पोलिसाला, ‘मी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा आहे, याने मला शिवी दिली, याला मी सोडणार नाही’ असं म्हणत असल्याचं दिसून आलं आहे. या 22 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये कणकवलीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, भर पावसात आणि कोरोना परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांशी कसे वागावे याचे भान पण उन्मत्त खासदार पुत्राला राहिले नाही. हा सत्तेचा माज आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.