माझ्या विरूद्ध एक बलाढ्य यंत्रणा होती…. ‘रावरंभा’ चा टीझर शेअर करत किरण माने यांचं ट्रोलर्सना प्रतिउत्तर
सातारा : बिगबॉसफेम, अभिनेता किरण माने सतत आपल्या लेखणीतून समाजाला आरसा दाखवण्याचं काम करत असतात आता पुन्हा एकदा ‘रावरंभा’ या चित्रपटाचा टीझर व्हिडिओ पोस्ट करून मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्यानंतर त्यांना देण्यात आली वागणूक त्या विरुद्ध त्यांनी दिलेला लढा अशातच ‘रावरंभा’ या चित्रपटात मिळालेला रोल याबद्दल त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.
वाचा काय लिहिले आहे फेसबुक पोस्टमध्ये ?
…लै बेक्कार घमासान युद्ध चाल्लंवतं आयुष्याशी. माझ्या विरूद्ध एक बलाढ्य यंत्रणा होती. मी एकटा जीव खाऊन लढत होतो. अर्थात ‘आय सपोर्ट किरण माने’ म्हणत लाख्खो लोक पाठीशी उभे होते. त्याचवेळी या पिच्चरचं शुटिंग सुरू झालं.
वास्तवात ज्या मानवतावादी विचारांची भुमिका घेत होतो…झुंज देत होतो..त्याचवेळी मोठ्या पडद्यावरबी त्याच विचाराचा धागा असणारी ‘भुमिका’ करायला मिळावी, हे वेगळंच आश्चर्य होतं !
त्यावेळी कायम लक्षात राहिल अशी एक घटना घडली… आमचा एक स्पाॅटबाॅय धावत-धावत माझ्या व्हॅनिटीमध्ये आला… चेहर्यावर संताप दिसत होता.. “सर, फेसबुकवर एकानं तुम्हाला ट्रोल करत लिहीलंय.. ‘आता कसा बसलास घरी.. काम गेलं हातातनं.’ त्येच्यायला त्येच्या.. सर मला लै राग आलाय.. त्याला ओरडून सांगावं वाटतंय ‘आमचा सातारचा वाघ घरी बसनार्यातला नाय..’ तुमचा आत्ता शुटिंग करतानाचा फोटो टाकू का??” मी कसंतरी त्याला समजावलं की दुर्लक्ष कर.. काळ उत्तरं देतो सगळ्याची..
खरंच काळानं उत्तरं दिली. पिक्चरचा हा पहिला टीझर येईपर्यन्तच परिस्थिती पूर्णपणे बदललीय. मी भरपूर काम करतोय. माझ्यावर आरोप करणारे घरी बसलेत. अर्थात त्यांनाही खूप काम मिळो. माझा कुणावर राग नाही. माझ्यावर आरोप करणार्यातल्या एका अभिनेत्याचा काल फोनही आला झाल्या प्रकाराबद्दल माफी मागणारा… असो.
‘रावरंभा’ कायम माझ्या काळजाच्या जवळ राहिल, ते अशा अनेक गोष्टींमुळे.
अनुप, हा टीझर पाहून लोक भारावलेत मित्रा. तुझं स्वप्न, ‘ड्रीमप्रोजेक्ट’ साकार होतंय. आपण दोघेही खटाव तालुक्यात लहानाचे मोठे झालो. “किरणदादा,जेव्हा तुमच्या तोलामोलाचा रोल येईल, तेव्हा मी नक्की तुम्हालाच तो देईन” हा तुझा शब्द तू पाळलास. शशीदादा पवार, राजधानी सातार्याच्या मातीतनं त्याच तोलामोलाचा ऐतिहासिक सिनेमा दिलात. प्रताप गंगावणे सर, तुमच्या सशक्त लेखणीला मोठ्या पडद्यावर उशीरा का होईना खरा न्याय मिळाला. तुम्हा तिघाही सातारकरांचे खूप खूप मनापासून आभार !!! <3
- किरण माने.