Latest Marathi News

BREAKING NEWS

माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या – उद्धव ठाकरे

0

 

“काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या,” असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या अभूतपूर्व बंडाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं. या सर्व घडमोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच ‘सामना’चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुलाखत दिली.

या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित झाला. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासह भाजपवर जोरदार शाब्दिक वार केले.सडलेली पानं आता गळून पडत आहेत. काही दिवसात नवीन पानं पुन्हा येतील, असं शब्दात बंडखोरांचा उल्लेख केला आणि सध्याची परिस्थिती बदलेल असा आशावाद व्यक्त केला. आपल्यासोबत अनेक वरिष्ठ शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आशीर्वाद देत आहेत, अस उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडले नाहीत असा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला. या काळात उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया देखील झाल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव उद्धव ठाकरे राज्यभर फिरले नाही, असंही सांगण्यात आलं. मुलाखतीत शस्त्रक्रियेविषयी बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले.

‘शस्त्रक्रियेनंतर एकदा मानेखालील शरीराची हालचाल बंद पडली होती,’ असं त्यांनी सांगितलं. “काहीजण मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. आता तेच लोक पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या,” असा मोठा आणि गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.

Leave A Reply

Your email address will not be published.