माझा घातपात घडवण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. माझा मेटे करण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रारच चव्हाण यांनी नांदेड पोलिसांकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी अशोक चव्हान यांनी नांदेडच्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली होती.
आपला विनायक मेटे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. आपल्या घातपातचा कट रचला जात असून भाडोत्री लोकांकडून आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यासंदर्भात त्यांनी नांदेड पोलिसांत तक्रार दिली असून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अशोक चव्हाणांनी केली आहे.
मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले आहे. या बाबीची कुणकुण मला अगोदरच लागली होती. फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही मला मिळाले होते असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. त्यामुळे मी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानुसार त्या प्रकरणाची 31 जानेवारीपासून पोलीस चौकशीही सुरू झाली आहे असे चव्हाण यांनी सांगितले.