Latest Marathi News

BREAKING NEWS

मविआ सरकारच्या काळात झालेले नुकसान भरून काढायचे आहे

0

राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय नेते एकमेकांवर टीका-टिपण्णी करत असतात. अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली होती. “शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे.” असे ते म्हणाले होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न हे वक्तव्य रोहित पवार यांनी प्रसिद्धीसाठी केले आहे.” असे ते म्हणाले.

रोहित पवार यांनी शिवसेनेनंतर आता भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव आहे, असे म्हटले होते. त्याविषयी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. “त्यांनी हे वक्तव्य प्रसिद्धीसाठी केले आहे. त्यांचे घर फोडायला इथे कुणालाही वेळ नाही. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे जे काही नुकसान झाले आहे, ते आम्हाला भरून काढायचे आहे. आम्हाला राज्याची घडी पुन्हा बसवायची आहे. त्यामुळे आम्हाला कोणाचे घर फोडायला वेळ नाही.” असे ते म्हणाले.

रोहित पवारांचे हे विधान सध्या चर्चेचा विषय बनले आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “भाजप संपूर्ण देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी त्यांनी १० जन्म घेतले; तरी आमचा पक्ष फुटणार नाही.” असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.