मुंबई | मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. महापुरुषांच्या अवमानाचा निषेध करण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये लाखो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. या मोर्चाला भायखळ्यामधून सुरुवात होणार आहे. मात्र जिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे, तिथेच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहे.
या बॅनरमधून उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावण्यात आला आहे. मराठा युवासेनेकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनरमध्ये नेमकं काय म्हटलं? या बॅनरवर सुषमा अंधारे यांचा फोटो लावण्यात आला असून, अंधारे यांनी साधू संतांबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य छापण्यात आले आहे. तसेच यावरून उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावण्यात आला आहे. सत्तेसाठी अजून किती लाचार होणार? हाच का तुमचा हिंदुत्वाचा विचार असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आला आहे. हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत.
आज ‘मविआ’चा महामोर्चा महापुरुषांबाबत सुरू असलेल्या अवमानकारक वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी आज मविकास आघाडीच्या वतीने मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला भायखळ्यातून सुरुवात होणार आहे. मोर्चात लाखो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा दावा मविआकडून करण्यात आला आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार असे महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.