मध्य प्रदेशातील ४६ विधानसभा जागांसाठी भारतीय जनता पक्ष उमेदवार ठरविण्याची जबाबदारी महाराष्ट्रातील भाजपचे ५० तडफदार नेते व आमदार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हे नेते एका आठवड्याच्या आत उमेदवारांची यादी भाजप पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत. यामध्ये आमदार प्रसाद लाड यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशात मागच्या २० वर्षांपासून भाजपा सत्तेत आहे. या सरकारला प्रस्थापितविरोधी जनमताचा फटका बसू नये म्हणून भाजपने उत्तम उमेदवारांच्या निवडीवर आपले सारे लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्राच्या सीमेलगत मध्य प्रदेशमधील ४६ विधानसभा जागांवर उमेदवार निवडण्यासाठी महाराष्ट्रातून ५० भाजप आमदार, नेत्यांना येत्या दोन दिवसांत मध्य प्रदेशात पाठवावे, असा आदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भाजप आमदार, नेते लवकरच भोपाळमध्ये पोहोचून उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होतील. ते नेमून दिलेल्या विधानसभा मतदारसंघात आठवडाभर राहतील. त्यानंतर उमेदवाराचे नाव निश्चित करून ते २५ ऑगस्टपर्यंत भाजप पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येईल. खांडवा, बुऱ्हाणपूर, खरगोन, बैतूल, आमला, छिंदवाडा, बालाघाट जिल्ह्यांतील या विधानसभा जागांवर उमेदवार निवडण्याबरोबरच त्याला जिंकून आणण्याची जबाबदारीही महाराष्ट्रातील तडफदार भाजप नेते, आमदारांवर सोपविली जाणार आहे.